आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये महामुकाबला होणार आहे. क्रिकेट विश्वाला या सामन्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघांचा या मोहिमेतील दुसरा सामना आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत बांगलादेशला 6 विकेट्सने चितपट करत विजयी सलामी दिली.
तर यजमान पाकिस्तानला स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला.त्यामुळे पाकिस्तानसाठी भारतविरुद्धचा सामना हा अटीतटीचा असणार आहे.पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपदाचा मान आहे. मात्र भारताचे सर्व सामने हे सुरक्षिततेच्या कारणामुळे दुबईत खेळवण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानला यजमान असूनही दुबईत यावं लागलं आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला रविवारी 23 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
भारत-पाकिस्तान सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.
भारत-पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
भारत-पाकिस्तान सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. क्रिकेट चाहते मराठीसह एकूण 9 भाषेत कॉमेंट्री ऐकू शकतात.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान क्रिकेट टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि सौद शकील.