सध्या प्रत्येक भागात गुन्हेगारीच्या प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी त्याचबरोबर अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. नुकतेच विटा येथील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. विटा शहरासह खानापूर तालुक्यात अनेक गावगुंड विविध गुन्हेगारी घटनांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच विटा शहरात सुरू असणारे दोन नंबरचे धंदे आणि गैरकृत्यांवर बातम्या लावून जिओ मराठी च्या माध्यमातून आवाज उठवल्याचा राग मनात धरून विट्यातील लेंगरे रस्त्यावर राहणाऱ्या सागर भानुदास चोथे आणि सावरकर नगर येथील विनोद रामचंद्र सावंत यांनी जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्या विरोधात कट रचून त्यांच्यावर खुनी हल्ला केला. सराईत गुन्हेगार राहुल जाधव आणि सुनील पवार तसेच सोबत असणाऱ्या अभिषेक अदाटे आणि सचिन तावरे यांना हाताशी धरून सागर चोथे आणि विनोद सावंत यांनी अकरा फेब्रुवारी रोजी कट रचला.
त्यानुसार त्याच दिवशी रात्री पावणेआठ वाजता संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर ऑफिसमध्ये घुसून कोयत्या सारख्या हत्याराने आणि स्टीलच्या रोडने हल्ला चढवण्यात आला. यानंतर हल्ल्यातील चार आरोपींना विटा पोलिसांनी तातडीने अटक केली. परंतु प्रसाद पिसाळ यांच्या खुनाचा कट रचणारे मुख्य सूत्रधार सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत यांनी विटातून पळ काढला.
यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि एलसीबी चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याप्रकरणी स्वतः लक्ष घालून फरार आरोपी सागर चोथे आणि विनोद सावंत यांना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. परंतु महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशा राज्यात पळून गेलेले सागर चोथे आणि विनोद सावंत गेल्या बारा दिवसांपासून सांगली पोलिसांना आव्हान देत राहिले.
यावेळी डीवायएसपी विपुल पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांनी वीटा पोलिसांची पथके नेमून सागर चोथे आणि विनोद सावंत चा तपास अधिक ताकदीने गतिमान केला.
अशातच कायदा हातात घेऊन आणि प्रसाद पिसाळ यांच्या खुनाचे कारस्थान करणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंत यांनी शेवटच्या क्षणात मात्र थेट कायद्याची मदत घेऊन स्वतःचा अटकपूर्व जामीन घेण्यासाठी विट्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा दरवाजा वाजवण्यास सुरुवात केली. परंतु अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती आर. आर. भागवत यांनी काल शुक्रवारी सागर भानुदास चोथे आणि विनोद सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून कोर्टाची दारे बंद केली.
या मोठ्या निर्णयामुळे विट्यातील सर्वसामान्य लोकांना मोठा न्याय मिळाला. परंतु पोलिसांना हलक्यात घेतलेले सागर चोथे आणि विनोद सावंत हे दोघे फरारच होते. तर दुसरीकडे डीवायएसपी विपुल पाटील यांनी गुप्त फिल्डिंग लावून पोलीस यंत्रणा सातत्याने ऍक्टिव्ह ठेवली होती. पोलिसांना सातत्याने चकवा देणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतच्या हालचाली शोधण्यासाठी डीवायएसपी विपुल पाटील वॉच ठेवून होते.त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे यांनी रात्रीचा दिवस करून आपली सर्व ताकद पणाला लावून पोलिसांना आव्हान देणाऱ्या सादर चोथे आणि विनोद सावंत चा पाठलाग सुरूच ठेवला.
सागर चोथे आणि विनोद सावंत हे पुण्याच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलीस कर्मचारी उत्तम माळी यांना मिळाली. परंतु सागर चोथे आणि विनोद सावंत सातत्याने मोबाईल सिम कार्ड आणि आपले ठिकाण बदलून पळ काढत असल्याने पोलिसांना या दोघांना पकडण्यात अपयश येत होते. परंतु दोन्ही फरार आरोपींना अखेर पोलिसांनी तब्बल 12 दिवस पोलिसांना चकवा देणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतच्या विटा पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
त्यानुसार काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुणे येथील नांदेड सिटी परिसरात एका लॉजवर लपवून बसलेल्या सागर चोथे आणि विनोद सावंत याला विटा पोलीस ठाण्यातील कर्मचारी उत्तम माळी, हेमंत तांबे वाघ आणि महेश देशमुख यांनी ताब्यात घेतले. यानंतर रात्री उशिरा सागर चोथे आणि विनोद सावंतला पोलिसांनी अटक करून जेलबंद केले.
