सध्या अनेक ठिकाणी यात्रा सुरु आहेत. अनेक कार्यक्रमांचे आयोजन यात्रेंनिमित्त करण्यात येते. अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील अमोल पाटील दादा युवाशक्ती यांच्या वतीने दि. २८ ते १ मार्चदरम्यान श्री म्हसोबा देवस्थान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमोल पाटील यांनी दिली. अमोल पाटील म्हणाले, यावर्षीपासून प्रथमच म्हसोबा मंदिर परिसरामध्ये यात्रेचे व बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने म्हसोबा मंदिर परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. दि. २७ रोजीग्रामस्थांकडून नैवेद्य दाखवला जाईल. दि. २८ हा यात्रेचा मुख्य दिवस आहे, तर १ मार्च रोजी म्हसोबा मंदिर परिसरात भव्य बैलगाडी शर्यती भरविण्यात आल्या आहेत. या बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी तीन लाख पाच ५५९ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख ५५ हजार ५५९, तर तृतीय दोन लाख ०५ हजार ५५९ व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
शर्यतीचे आयोजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल पाटील दादा युवाशक्तीतर्फे करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
