इचलकरंजी शहरवासीयांची २० वर्षापासून पाण्यासाठी तडफड; नागरिकांना काळ्यापाण्याची शिक्षा 

कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेली सुळकुड योजना रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर इचलकरंजी शहरात खळबळ उडाली आहे. गेली दोन विधानसभेच्या निवडणुका आणि दोन लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून इचलकरंजी शहराला आम्हीच पाणी देणार असे ठासून सांगणारे नेते या घोषणेनंतर मात्र कोठे गायब झाले आहेत हे कळत नाही. छोट्या-छोट्या गोष्टीवर पत्रकार बैठका घेणारे राजकीय पक्षातील नेते आता कोठे आहेत. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे हसन मुश्रीफ यांनी आपण इचलकरंजीला पाणी देणार असे अनेकवेळा म्हटले होते. मात्र, तेही आता बोलण्यास तयार नाहीत. माजी आम. प्रकाश आवाडे, आम. राहुल आवाडे, माजी आम. सुरेश हाळवणकर, अभ्यासू नगरसेवक विठ्ठल चोपडे, विरोधी नेते शशांक बावचकर, सागर चाळके, मदन कारंडे यांनी २४ तासांमध्ये तोंड उघडले नाही. जनता रस्त्यावर उतरणार का? असा प्रश्न विरोधकांचा आहे. तर आपणच पाणी आणणार असे म्हणणाऱ्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर माजी आम. प्रकाश आवाडे यांनी पाणीप्रश्नी घोरपडे नाट्यगृह चौकात जाहीर सभा घेऊन सुळकूड पाणी योजना मीच आणणार! अशी घोषणा केली.

त्यानंतर ही घोषणा हवेतच विरल्याचे बोलले जात आहे. आता पुन्हा एखादी नदी, डोंगर, समुद्र यांची मालकी कोणाची आहे, हे ठरवण्याची वेळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आली आहे. प्रत्येकजण जर नदीवर आपली मालकी सांगत असेल आणि विविध कारणे देऊन शहराला पाणी देण्यास विरोध करीत असेल तर आता राज्याला ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. पाण्याचा प्रश्न येत्या काही दिवसात शहरामध्ये गंभीररुप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालकमंत्री कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.