शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करावीत, दुधाला हमीभाव द्यावा, दुधाचे रखडलेले अनुदान त्वरित मिळावे, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करावा, आदी मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे येथील साईमंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उन्मेश देशमुख म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिवसा वीज पुरवठा होत नाही. चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे बळीराजाचे जगणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे ‘एफआरपीनुसार दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे. दुधाचे रखडलेले अनुदान तत्काळ मिळावे. शेतीसाठी दिवसा आठ तास वीज पुरवठा करावा. या मागण्यांची तत्काळ पूर्तता करावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. आंदोलकांनी तहसीलदार सागर ढवळे आणि पोलिस निरीक्षक विनय बहिर यांना निवेदन देत अधिवेशनाच्या काळात शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याची विनंती करत आंदोलन स्थगित केले. आंदोलनात युवा प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, अशोक गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, विशाल पाटील, मनोज हवाले, कंकरभाई मुलाणी, संजय ढोक आदी उपस्थित होते.