सोलापूरचा अर्शीन कुलकर्णी होणार पुढचा हार्दिक? आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार

आयपीएल 2024 साठीचा लिलाव दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये नेहमीप्रमाणेच कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला.केकेआरने स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं.

तर ऑस्ट्रेलियाच्याच पॅट कमिन्ससाठी हैदराबादने 20.50 कोटी रुपये खर्च केले.आयपीएल लिलावामध्ये भारताचे अनकॅप खेळाडूही भाव खाऊन गेले. रॉबिन मिन्झ या विकेट कीपरसाठी गुजरातने 3.60 कोटी रुपये मोजले, तर सुशांत मिश्राला गुजरातने 2.20 कोटी रुपयांना, कुमार कुशाग्राला दिल्लीने 7.20 कोटी रुपयांना, समीर रिझवीला 8.40 कोटी रुपयांना विकत घेतलं.

शुभम दुबेसाठी राजस्थानने 5.80 कोटी रुपये खर्च केले. महाराष्ट्राचा ऑलराऊंडर असलेल्या अर्शीन कुलकर्णीला लखनऊ सुपर जाएंट्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं.अर्शीन कुलकर्णी भारताचा पुढचा हार्दिक पांड्या होऊ शकतो, असं बोललं जातं. अर्शीन कुलकर्णी धमाकेदार बॅटिंगसोबतच फास्ट बॉलिंगही करतो. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 च्या मोसमातून अर्शीन कुलकर्णी चर्चेत आला.

इगल्स नाशिक आणि पुणेरी बापू या सामन्यात अर्शीनने 50 बॉलमध्ये 117 रन केले, यानंतर याच सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या. एवढच नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये विरोधी टीमला विजयासाठी 5 रनची गरज असतानाही अर्शीनने बॉलिंगमध्ये या रन रोखून त्याच्या टीमला विजय मिळवून दिला होता.

नुकत्याच झालेल्या अंडर 19 आशिया कपमध्ये अर्शीन कुलकर्णी भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 4 सामन्यामध्ये अर्शीनने 138 रन केल्या, याशिवाय त्याने 4 विकेटही घेतल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्शीनने 70 रनची खेळी केली आणि 3 विकेटही घेतल्या.अर्शीन कुलकर्णीने स्थानिक क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 मधून पदार्पण केलं.

महाराष्ट्राकडून खेळताना अर्शीनने 6 सामन्यांमध्ये 121 रन केल्या, यासोबतच त्याला 4 विकेटही मिळाल्या. अर्शीन कुलकर्णी महाराष्ट्राच्या सोलापूरचा रहिवासी असून त्याचे आई-वडील डॉक्टर आहेत. हडपसरच्या कॅडन्स ऍकेडमीमध्ये तो अंडर-14 पासून आहे. पुण्यामध्ये अर्शीन त्याच्या आजी-आजोबांसोबत राहतो.