बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरुन राज्यात संतप्त प्रतिक्रिया अजूनही सुरु आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आक्रोश व्यक्त होत आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आंदोलने होत आहे. त्याचवेळी पुन्हा एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सुटाळा ग्रामपंचायतच्या सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहे. किरकोळ कारणावरुन हा हल्ला झाल्यामुळे राज्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
काय घडला प्रकार
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथील सरपंच निलेश देशमुख यांच्यावर लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत निलेश देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे.
का झाला हल्ला?
हॉटेलमध्ये थुंकण्यावरून हा वाद झाला आहे. सरपंच निलेश देशमुख आणि त्यांचे मित्र हे बारमध्ये जेवायला बसलेले होते तर आरोपी सुद्धा बाजूच्या केबिबमध्ये जेवायला बसलेले होते. दोन्ही गटात यावेळी थुंकण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या शुल्लक कारणामुळे सरपंच निलेश देशमुख यांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच देशमुख यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सुद्धा आपणास सरपंचसह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, राज्यात गुन्हेगारांकडून हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
