इस्लामपूर पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी! घोषणांनी परीसर दणाणला

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी करुन शास्तीकर आकारणी माफ झालीचं पाहीजे.

उपयोगकर्ता करवाढ रद्द झालीचं पाहीजे, संकलित करांच्या बिलांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्त झाल्याच पाहिजेत, घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या व्हि.डी. के कंपनीवर कारवाई व्हावी. जंतुनाशक औषधे व धुर फवारणी करावी. पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत, पालिका हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी शिवसैनिकांनी (ठाकरे गट) परीसर दणाणून सोडला.

शकिल सय्यद म्हणाले, पालिका प्रशासन मनमानी कारभार करत आहे. शास्ती कर पुणे, पिंपरी चिंचवड येथे माफ झाला आहे. नगरचे महापालिका आयुक्त शास्ती कर माफ करतात. मग इस्लामपूर पालिकेचा मनमानी कारभार असा का. महाराष्ट्र शासनाने ६०० स्केअरफुटांपर्यंतच्या बांधकामाला शास्ती लावता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख असणारा शासन आदेश काढला आहे.

शहर स्वच्छता ठेका ४ कोटींवर गेला आहे. दोन वर्षांत जंतुनाशक औषधे गटर स्वच्छता, धुरफवारणी नसल्याने शहरात व उपनगरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यू सारख्या भयानक रोगाचा सामना जनतेला करावा लागत आहे. व्ही.डी.के. कंपनीवर पालिकेने फौजदारी करुन काळ्या यादीत टाकावे.

शहर व उपनगरात गुंठेवारी समस्या गंभीर आहे. गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द करून प्रलंबित ४ हजार फायली निकालात काढून गुंठेवारी प्रमाणपत्र अदा करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना शासनाचा लाभ द्यावा. रास्त मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा दिला.