रविंद्र माने यांनी शिष्टमंडळासह आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कॉ. मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम तातडीने सुरु करावे, महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणीसाठी समितीची स्थापना करुन आवश्यक त्या परवानग्या तातडीने घ्याव्यात, पुतळा उभारणीसाठी आवश्यक तो आराखडा तयार करुन कामाला सुरुवात करावी आणि शिवतिर्थ टप्पा क्रमांक दोनचे काम तातडीने सुरु करावे या मागणीसह अन्य विषयांबाबत आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
सुळकूड योजनेसंदर्भात शासनाकडे कोणता प्रस्ताव पाठविला आहे, त्या प्रस्तावाचे पुढे काय करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हाधिकारी प्रशासक असल्याने याची माहिती त्यांच्याकडेच मिळेल असे आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले. निधी मंजूर असूनही प्रलंबित असणाऱ्या कामाबाबत चर्चा करत सदरची विकास कामे व महात्मा बसवेश्वर व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी माने यांनी केली.
ज्ञानेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण, भोमाळ येथील विठ्ठल मंदिरासमोर वारकरी संप्रदायास उन्हामध्ये बसावे लागते. पूजापाठ व भजन करतेवेळी उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी सभामंडपाची उभारणी करावी अशी मागणीही वारकरी संप्रदायातील शिष्टमंडळाने केली. यावेळी शिवसेना शिंदे गट व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.