इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक शकिल सय्यद यांच्या नेतृत्वखाली घेराव घालण्यात आला. मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, पाणी आमच्या हक्काचे नाही प्रशासकाच्या बापाचे, गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमलबजावणी झालीच पाहिजे, गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द झाल्याच पाहिजेत, स्वच्छता ठेका रद्द झालाच पाहिजे, ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी पालिका परीसर दणाणून सोडला. यावेळी सय्यद यांनी प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला.
करवसुलीचे कारण पुढे करत हुकुमशाही पद्धतीने पाणी कनेक्शन बंद करता येणार नाही. पठाणी पद्धतीने वसुलीसाठी जे नळ कनेक्शन बंद केले आहेत ते सत्वर सुरू करावेत. थकबाकी दारांना अभय योजना राबवुन कराची रक्कम चार हप्त्यामधे भरुन घ्यावी. शास्ती कर माफ करावा.प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मालमत्ता धारकांना शास्तीकराला सामोरं जावं लागत आहे. मालमत्ता धारकांनी रीतसर बांधकाम परवाने मागणी केल्यास गुंठेवारीचे कारण पुढे करत परवाने दिले नाहीत.
प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे शहरात पाणीपुरवठा विभागाची वाटोळं झालं आहे. यावेळी जमीर नालबंद, दिपक कळसे, अतुल गुरव, तात्यासाहेब बामणे, अशोक चव्हाण, रामराव थोरात, अरुण कुपाडे, इकबाल वायकर, प्रभाकर कुरळपकर, अॅड. धनाजी पाटील, अॅड. रोहीत वर्णने, शिवसैनिक आदी उपस्थित होते.