वाळवा-शिराळा तालुक्यामध्ये लॉजवर अनैतिक व्यवसाय…

वाळवा – शिराळा तालुक्यात पाण्याची मुबलकता असल्याने काही गावे सधन आहेत. त्यामुळेच बेकायदेशीर उद्योगाला उत आला आहे. विशेषतः शहरी भागापासून जवळच्या काही गावांमध्ये बेकायदेशीर लॉज सुरू आहेत. यावर शासनाचे नियंत्रण नसल्याने विश्रांतीसाठी असलेल्या या ठिकाणी अनैतिक व्यवसाय जोमात सुरू आहेत. या बेकायदेशीर लॉजवर पोलिस कारवाई करणार का? असा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे.शहरी भागात बसस्थानक परिसर मध्यवर्ती चौक आदी ठिकाणी लॉजमध्ये अनैतिक धंदे जोमात सुरू आहेत.

याशिवाय महामार्गालगत बहुतांशी असे बेकायदेशीरपणे लॉज व्यवसाय चालवला जातो. शहरी भागातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुर्गम परिसरात लॉज सुरू केले जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनैतिक व्यवसाय सुरू असतो. याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अधिकृत माहिती अशी की, लॉज उभारण्यासाठी पोलिस, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

परंतु या व्यवसायासाठीचे नियम व कायदे शिथिल करण्यात आले आहेत. शहरी भागात महापालिका आणि नगरपालिकांकडून व्यवसायाला परवानगी दिली जाते. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून परवानगी घेण्यात येते. त्यामुळेच विश्रामगृहाच्या नावाखाली बेकायदेशीर लॉजेस उभी केली जात आहेत. नागरी वस्तीपासून दूर एखादी खोली बांधून त्याला लॉज म्हणून संबोधले जाते. याचीही कसून चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.