…तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मशि‍दीवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेत भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी ६ ते रात्री १० या काळात सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याबाबत कायद्यानुसार, जर अधिक डेसिबलने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला केंद्राने दिले आहेत. पोलिसांनी पुढाकार घेऊन MPCB कळवायचं आहे, त्यानंतर त्या बोर्डाने पुढची कार्यवाही जे काही आरोपपत्र, कोर्टात खटला भरायचा अशी सध्या कायद्याची परिस्थिती आहे. ज्याप्रकारे या गोष्टीचा अवलंब व्हायला हवा तसा होत नाही हे खरे आहे अशी कबुली त्यांनी दिली.

दरम्यान, प्रत्येक पोलीस निरीक्षकाने त्यांच्या विभागातील प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्याची परवानगी घेतलीय की नाही हे तपासलं पाहिजे. आपण सगळ्यांना मीटर दिलं आहे, त्यात आवाजाचं डेसिबल मोजता येते. ही मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे. प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाला कळवणे, त्यांच्यामार्फत कारवाई करणे आणि दुसरं जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी न देणे अशी कारवाई केली जाईल. अतिशय कठोरपणे या गोष्टीचे मॉनेटरिंग केले जाईल असंही मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.