महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष इंदिरा शिक्षणसंस्थेचे माजी सहसचिव व न्यू इंग्लिश स्कूल वाळूज या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्वर्गीय विजयसिंह गायकवाड यांचा चतुर्थ पुण्यस्मरणदिन विद्यालयाच्या प्रांगणात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इंदिरा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष रविआण्णा देशमुख, सचिव प्रा. कृष्णराव देवकर यांच्या हस्ते स्व. विजयसिंह गायकवाड व स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी स्व. विजयसिंह गायकवाडसरांनी इंदिरा शिक्षणसंस्थेच्या उभारणीसाठी दिलेले योगदान, मुख्याध्यापक महामंडळाचे अतिशय प्रभावीपणे केलेले नेतृत्व विद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी राबवलेले विविध उपक्रम यासारख्या त्यांनी केलेल्या विविध कार्यांना व स्वर्गीय पतंगराव कदमसाहेब यांनी विद्यालयाच्या मंजुरीसाठी केलेल्या सहकार्याला उजाळा देण्यात आला.
त्यांच्या आठवणीने काही काळ विद्यालयात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना रविआण्णा देशमुख म्हणाले, बाळूज परिसरातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने आम्ही काही शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने इंदिरा शिक्षण संस्थेची स्थापना केली. आम्ही लावलेल्या या छोट्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचे काम स्व. विजयसिंह गायकवाडसरांनी केले. शाळेत प्रवेश करताच त्यांच्या सर्व आठवणी जाग्या होतात. विद्यालयाच्या कणाकणात त्यांचे अस्तित्व असल्याचे जाणवते. त्यांच्या जाण्याने विद्यालयामध्ये निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. विद्यालयाच्या मंजुरीच्या वेळी स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केले. आमच्या विद्यालयाच्या प्रगतीकडे त्यांचे सदैव लक्ष होते.