सांगोला भूमी अभिलेख अंतर्गत नाझरे येथील सिटीसर्व्हे भूमापन कार्यालय सतत बंद असल्याने या सिटीसर्व्हे भूमापन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत, अथवा त्या कामासाठी सांगोला येथे जावे लागते. या ठिकाणच्या कार्यालयाचा कारभार आता रामभरोसे झाला आहे. या कार्यालयाची सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या भूमापन कार्यालयासाठी नाझरे, बलवडी, अजनाळे, उदनवाडी, वाटंबरे, कोळे, लोटेवाडी जुनी व नवी गौडवाडी, खवासपूर, यलमार मंगेवाडी, चोपडी, हातीद, पाचेगाव बुद्रुक, कारंडेवाडी, गुणापाचीवाडी, हटकर मंगेवाडी, कारंडेवाडी, जुनोनी, बुध्देहाळ, पाचेगाव खुर्द, राजुरी, तिप्पेहाळी आदी गावांसाठी हे ऑफिस आहे.
आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी उघडे असते. इतर दिवशी बंद असते. यातच मंगळवार व शुक्रवारीसुद्धा कार्यालय बंद असल्याने अनेक नागरिक कार्यालयाच्या बाहेर अधिकारी येतील म्हणून पाच-सहा तास वाट पाहतात. वैतागून अखेर निघून जातात. कार्यालय प्रमुख येणार नसतील, तर तसा बोर्ड लावावा. परंतु, नागरिकांना काही समजत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधितांचे याकडे अधिकच दुर्लक्ष होत आहे.
सध्या हे कार्यालय सुट्टी दिवस सोडून दररोज उघडे ठेवावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे अनेक गावचा उतारा काढण्याचे काम अगर इतरत्र कामे होतील. त्यामुळे सध्या तरी सिटीसर्व्हे कार्यालयाची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे.