इचलकरंजी शहर व परिसरात उत्तर भारतीयांनी प्रथेनुसार रंगाची उधळण करत रंगपंचमी खेळत उत्साहात वसंत ऋतुचे स्वागत केले. शुक्रवारी इचलकरंजीत होलिकोत्सव अंतर्गत रंगाची उधळण करण्यात आली. यानिमित्त शहरात विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वस्त्रोद्योग आणि अन्य व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातून राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार आदी उत्तर भारत प्रांतातील अनेक कुटुंबे इचलकरंजीत स्थायिक झाली आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रांतातील सण, पारंपरिक चालीरितीसुध्दा येथे उत्साहात स्थानिकांच्या सहभागातून साजऱ्या केल्या जातात. उत्तर भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन दिवशी रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
इचलकरंजी शहरातील कापड मार्केट, बीजेपी मार्केट, श्री मदनलालजी बोहरा मार्केट, महेश नगर, बसंत कॉलनी, राधाकृष्ण चौक, आयोध्यानगर, आवाडेनगर, श्रीपाद नगर, नाकोडा नगर, यशोलक्ष्मी नगर, पारीक कॉलनी, महेश कॉलनी आदी परिसरात हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी करण्यात आली. सकाळपासूनच युवक-युवती गटागटाने रंग घेऊन एकमेकांना रंगात न्हाऊन सोडत होते. त्यामध्ये ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचाही सहभाग होता. बच्चेकंपनीसह युवक हातात सुके रंग घेऊन एकमेकांना रंगांची आंघोळ घालत होते. होळीवर आधारित जुन्या, नव्या हिंदी – मराठी गाणीही वाजत होती.
शहरासह गावातही होळीच्या सणात सारेच मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. युवक-युवती डिजेच्या तालावर नाचत होती. एकमेकांना रंगात रंगवत होती. काहीजण वाहनांमधून वाद्यांच्या गजरात एकमेकांकडे जाऊन आप्त- नातलग, मित्रांना रंगात न्हाऊन टाकत होते. रंगपंचमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी थंडाई व मिठाई वाटप करण्यात येत होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.