विट्यात पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे; रिल्स मधून पोलिसांना खुले आव्हान 

विटा शहरातील मुख्य चौकात रस्त्यावर वाढदिवस करून धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी गेलेले पोलीस निरीक्षकच चक्क धिंगाणा घालणाऱ्या युवकांनाच बुके देऊन आल्याचा धक्कादायक प्रकार विटा (ता. खानापुर) येथे उघडकीस आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या रिल्स मधून हा खळबळजनक प्रकार समोर आला. विटा येथील नेवरी नाक्यावरील चौकात रस्त्यावर दुचाकी लावून काही युवक वाढदिवस करत धिंगाणा करत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करत धिंगाणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना उचलून थेट पोलीस ठाण्यात आणले. या युवकांवर आता काहीतरी धडक कारवाई होणार असे वाटत असतानाच कोणत्या तरी बड्या नेत्याचा साहेबांना फोन आला आणि वातावरणच बदलून गेले. 

धिंगाणा घातला म्हणून पोलीस स्टेशनला आणलेल्या या युवकांना तात्काळ सोडून देण्यात आले. इतकेच नव्हे तर ज्याचा वाढदिवस होता. त्या युवकाला पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी चक्क बुके देऊन त्याचाच सत्कार केला. विशेष म्हणजे नेवरी नाक्यावर वाढदिवस साजरा करत असताना कारवाईसाठी आलेली पोलीस गाडी, कारवाई नंतर पोलीस स्टेशनकडे दुचाकीवरून जाणारे कार्यकर्ते, संबंधित युवकाला बुके देताना पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि आमदार सुहास बाबर यांना कॉल केलेला स्क्रीन शॉट असे दाखवून देणारी रिल्स या युवकांनी बनवून सोशल मीडियात व्हायरल केली.

त्यामुळे राजकीय क्षेत्रातून देखील या विषयावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. अर्थातच चौका चौकात रस्त्यावर दुचाकी लावून धिंगाणा करत वाढदिवस साजरा करणाऱ्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपापल्या नेत्यांनी समज द्यावी, अशी मागणी विटेकर नागरिकांतून होत आहे.