इस्लामपूर येथील परिसरात अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई

कामेरी, इस्लामपूर येथील अवैध धंद्यावर इस्लामपूर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश सुनील वडार, योगेश पांडुरंग मदने, जयेश प्रकाश कदम अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी कामेरी येथे छापा टाकला. त्यावेळी संशयित प्रथमेश हा आडोशाला मटका चिट्ठी घेताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून साहित्य, १ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली.

कामेरीत येथे संशयित योगेश मदने याच्याकडे विक्रीसाठी आणलेल्या देशी दारूच्या १२ बाटल्या सापडल्या. सोमवारी इस्लामपूर येथील गांधी चौकात संशयित जयेश कदम याची दुचाकी पोलिसांनी थांबवली. पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्याकडे विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी ३ हजार ८८० रुपयांचे मद्य, ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा ७३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.