हुपरी येथील नेर्लेकर पिता-पुत्राचा जामीन अटकपूर्व फेटाळला

हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील नेर्लेकर पिता-पुत्रांनी ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करुन जादा परताव्याचे अमिष दाखवून कर्नाटक, महाराष्ट्रातील लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या बालाजी नेर्लेकरचा जामीन तर बेपत्ता असलेल्या राजू नेर्लेकर याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. मात्र पोलिसांना गुंगारा देत अद्याप ठकसेन सापडत नसल्याने याला अभय कोणाचे असा सवाल उपस्थित केला जात आहे. या ऑनलाइन गुंतवणूकीत कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र व गोवा व कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, हातकणंगले, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, आजरा, चंदगड तर सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यात नेर्लेकर पिता पुत्राने फसवणुकीचे जाळे टाकून कितीतरी लोकांना गंडा घातला आहे.

विवीध ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही अद्याप मुख्य सूत्रधार ठकसेन राजेंद्र नेर्लेकर बेपत्ता आहे. आंध्र पोलिसरांच्या वॉरंटला केराची टोपली दाखवण्यात माहीर असलेल्या ठकसेनला सांभाळणारी एक यंत्रणा काम करत असल्याची शक्यता तक्रारदारांनी बोलून दाखविली आहे. ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटी ३५ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी नेर्लेकर पिता-पुत्रावर २२ आक्टोंबर २०२४ रोजी हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. बालाजी राजेंद्र नेर्लेकर अटकेत आहे. पुत्राने जामीन मागितला होता. मात्र इचलकरंजी येथील न्यायालयाने पिता-पुत्रांचा जामीन फेटाळला.