सध्या माघ महिना सुरु झालेला आहे. माघ वारी निमित्त गावागावांमधून पंढरपूर कडे रवाना झालेल्या आहेत. रिंगण सोहळा देखील अनेक भागात होतो. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी देखील पहायला मिळते. हातकणंगले तालुक्यातील टोप येथील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्यावतीने संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्लेश्वर मंदिर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सोहळा संपन्न झाला.
गेले तीन दिवस संपूर्ण टोप नगरी हरीनामाच्या भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. प्रत्येकाच्या मुखी विठु माऊलीचा जप सुरू होता. या सोहळ्या निमित्ताने उभे रिंगण व गोल रिंगण सोहळा सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला. याकरिता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी सोहळ्यातील अश्व टोपमध्ये दाखल झाले होते.
टोप येथे पार पडलेल्या हा सोहळा ‘यांची देहा, यांची डोळा’ अनुभवण्यासाठी टोप संभापुर, कासारवाडी, वडगांव, कोल्हापूर, सांगली, आष्टा, वाळवा, गगनबावडासह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रामपंचायत प्रांगण ते बाजारकट्टा असे उभे रिंगण साकारण्यात आले. यावेळी टाळ, मृदंग वीणा व हरी नामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने उभे रिंगण साकारण्यात आले.
पालखी सोहळा बैलगाडी, अश्व, टाळकरी, बाल विठ्ठल तसेच वारकऱ्यांसह टोप हायस्कूल ग्राउंड, रेंबो मैदानावर दाखल झाले. विठ्ठल रखुमाई भक्तांच्या साक्षीने अभुतपुर्व नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा साकारण्यात आला. अश्वांच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. प्रदक्षिनेनंतर पालखी माळवाडी मार्गे कल्लेश्वर मंदिरात आली. यावेळी किर्तन व नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी हजारो वारकरी उपस्थित होते.
