भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात नंदराज मारुती पाटील जागीच ठार झाला तर त्याचा मित्र सुशांत तात्यासाहेब पाटील हा गंभीर जखमी झाला. वडगाव-आष्टा रोडवर शिगाव-भादोले दरम्यान वारणा नदीच्या पुलाजवळ मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. चिकोडी तालुक्यातील चंदूरटेक येथील नंदराज पाटील हा सांगली येथील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. याच गावचा सुशांत पाटील हा गणपतराव आरवाडे महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत आहे. हे दोघे सांगलीत एकाच ठिकाणी राहण्यास आहेत. मंगळवारी सायंकाळी शैक्षणिक कामानिमित्त सरांना भेटण्यासाठी म्हणून तळसंदे येथे मोटारसायकल वरून आले होते.
रात्री उशिरा भादोलेहून सांगलीला निघाले असता भादोले- शिगाव दरम्यान त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या कारने जोराची धडक दिली. या धडकेने मोटारसायकल चरीत जाऊन पडली. यात नंदराज पाटील हा जागीच ठार झाला तर सुशांत पाटील गंभीर जखमी झाला. जखमी सुशांतवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून कारचा चालक सतीश एकनाथ देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, जावेद रोटीवाले करत आहेत. अपघातातील मयत नंदराज याचे आई-वडील शेती करतात. त्यांना एकुलता एक मुलगा होता.