खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

खेळता खेळता उकळलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्याने गंभीर जखमी झालेल्या येथील चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अवनी नंदकुमार बोरगावे (वय २) असे तिचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील हेगडे गल्लीतील नंदकुमार बोरगावे यांच्या शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील बहिणीचे सासरे वारले होते. तेथे तोंड गोड करायचा कार्यक्रम होता. त्यासाठी घरात पुरण पोळ्या केल्या होत्या.

आमटी तयार करून गार करण्यासाठी बाजूला ठेवली होती. बोरगावे यांच्या दोन्ही मुली खेळत खेळत स्वयंपाकघरात आल्या. तेव्हा छोटी मुलगी अवनी बाजूला ठेवलेल्या आमटीच्या भांड्यात पडल्यामुळे तिचे संपूर्ण शरीर भाजले. ती जास्त भाजली असल्याने तिला कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले होते. काल सकाळपासून तिच्यावर उपचार सुरू होते; मात्र रात्री उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.