बारा वर्षीय अल्पयवीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत मानवतेला आणि शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या विजय भागवत कुंडलकर या शिक्षकाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, इचलकरंजी बार असोसिएशनमधील कोणीही सदस्यांनी वकिलपत्र घेऊ नये, अशी मागणी आम्ही सावित्रीच्या लेकी महिला मंचच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बार असोसएशनचे अध्यक्ष अॅड. राजगोपाल तोष्णीवाल यांना देण्यात आले. यावेळी महिलांनी जोडे दाखवून निषेध व्यक्त केला. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहापूरमधील महिलांनी एका शिष्टमंडळाद्वारे शहापूर पोलीसांना दिले.
शहापूर येथे राहणाऱ्या विजय कुंडलकर या शिक्षकाने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार घरात सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या कृत्याने कुंडलकर याने शिक्षकी पेशाला काळीमा फासला असून या नराधमावर कठोर कारवाई करुन त्याला फाशीची शिक्षा द्यावी. या शिक्षकाचे इचलकरंजी बार असोसिएशनच्या कोणीही सदस्याने वकिलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली आहे. यावेळी सुषमा साळुंखे, शोभा गोरे, सुशिला पोसुगडे, यास्मीन सनदी, सुरेखा काटकर, मिना भिसे, सोनाली आडेकर, ज्योत्सना भिसे, स्वाती कांबळे, शकुंतला – पाटील, चित्रा दुधाणे, सिमा तिवारी, ग्यानती सिंग यांच्यासह मंचच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.