इचलकरंजी येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल 

इचलकरंजी येथे सौ. स्वाती अमोल ऐवळे हिने दुसरीही मुलगीच झाल्याने आणि चारित्र्याच्या संशयावरुन होणाऱ्या सासरच्या लोकांकडून होण्याऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन शहापूर पोलिसात पती अमोल ऐवळे, सासरा हनमंत ऐवळे, सासू सुरेखा ऐवळे आणि दिर राजू ऐवळे हे सर्व रा. कोरोची या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुरेश महादेव बिरलिंगे यांनी माहिती दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, स्वाती हिच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता.

परंतु दोन वर्षापूर्वी तिला पुन्हा मुलगीच झाल्याने पती, सासू, सासरा यांच्याकडून तिचा छळ सुरु झाला होता. घरातील सर्व कामे तिला करण्यास लावत विलंब झाल्यास शिवीगाळ केली जात होती. तिला माहेरच्या लोकांशी बोलून न देणे, माहेरी न पाठविणे तसेच चारित्र्याच्या संशयावरुन तिला मारहाण केली जात होती. या सर्व छळाला कंटाळून स्वाती हिने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.