महूद येथे किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग; ३५ लाखांचे नुकसान

सांगोला तालुक्यातील महूद येथील किराणामाल व हार्डवेअर दुकानाच्या गोदामाला शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत दुकानातील तसेच संसारोपयोगी साहित्य असे एकूण तीस ते पस्तीस लाख रुपयांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले. महूद येथील जुन्या बाजारपेठेत मारुती मंदिराशेजारी अजितकुमार हिरालाल गांधी यांचे किराणा माल व हार्डवेअरचे दुकान आहे. पुढे दुकान आणि मागील बाजूस गोदाम आहे.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोदामामध्ये आग लागून धुराचे लोट दिसू लागले. बघता-बघता आगीने उग्र स्वरूप धारण केले. त्यांच्या दोन मजली इमारतीवरून धुराचे लोट दिसू लागल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जमा झाले. गोदामामधील आगीमुळे वरच्या मजल्यावरील घरातही आग लागली. त्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला. आगीचे स्वरूप लक्षात येताच तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

जमलेल्या नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पाईपने पाणी मारण्यास सुरवात केली. काही वेळाने सांगोला नगरपालिकेची अग्निशमन गाडी येथे दाखल झाली. त्यानंतर आग आटोक्यात आली. सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांचे सामान आगीच्या भक्षस्थानी पडले.