इचलकरंजी येथे वस्त्रोद्योग टिकण्यासाठी राज्य शासनाने लक्ष देण्याची गरज; अशोक स्वामी

इचलकरंजी येथे सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्यावतीने येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डझनभर लोकप्रतिनिधीची नावे असलेली निमंत्रण पत्रिका काढण्यात आली,मात्र गलथान नियोजनाचा फटका बसल्याने शासनाचे पैसे वाया गेल्याची चर्चा उपस्थित मोजक्या प्रेक्षकात होती. कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींसह प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने उद्घाटनाचा सोपस्कार जवळपास २ तास उशिराने पार पडला.

राज्य शासनाच्यावतीनं इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या कार्यशाळेला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं प्रारंभ झाला. २ दिवस चालणार्‍या या कार्यशाळेत महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृती, वस्त्र संस्कृतीत होत असलेले बदल, वस्त्र संस्कृतीचंं महत्व आणि वस्त्र संस्कृतीचं जतन संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्यानं आणि चर्चासत्र होणार आहेत.पहिल्या दिवशी गलथान नियोजनाने उपस्थितीचा वणवा होता.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यशाळेला प्रारंभ झाला. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे मात्र यामध्ये वस्त्रोद्योगातील संस्था, जाणकार उद्योगपती यासह विविध घटकांना सामावुन घेणे गरजेचे होते असे नमुद करून राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्रोद्योग हा शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे किंबहुना छोट्या यंत्रमागधारकांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.

हा व्यवसाय टिकण्या आणि वस्त्रोद्योगासाठी सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग विभागाने काही विशेष योजना राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व घटकांना सामावून घेऊन अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी सूचना मांडत नियोजनावर अप्रत्यक्ष टीका केली. महापालिकेचे सहआयुक्त विजय राजापुरे यांनी वस्त्रनगरी इचलकरंजीत वस्त्रोद्योगाची कौतुकास्पद परंपरा असल्याचे सांगितले.