इचलकरंजी पाणी योजनेवर एप्रिलमध्ये निर्णय-सुळकुड योजना रद्द झाल्यास शहरवासियांचा उद्रेक होण्याची शक्यता

इचलकरंजीसाठी मंजूर सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजना संदर्भातील सद्यस्थितीची माहिती जाणून घेत या प्रश्‍नी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. इचलकरंजीसाठी राज्य शासनाने मंजूर केलेली दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात तसेच मागील आठवड्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्‍नावर लक्षवेधी मांडत बैठक घेऊन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अत्यंत गोपनीयरित्या घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील, नगर विकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार राहुल आवाडे यांनी, राज्य शासनाने इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. पण योजनेच्या कामाची अंमलबजावणी होत नाही.

उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानकोपर्‍यातून अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन तातडीने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, सुळकूड योजना संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेत कोणतीही अडचण येणार नाही, विरोध होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत विषयावर सखोल चर्चा केली. आणि या संदर्भात पुनश्‍च एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात बैठक घेण्याचे सांगितले.