आष्टा येथील अप्पर तहसिल कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम करणेसाठी रु. १५ कोटी इतका निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी निवेदनाद्वारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. निशिकांत भोसले पाटील यांनी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात त्यांची भेट घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे वाळवा तालुका अध्यक्ष प्रवीण माने उपस्थित होते.
निशिकांत भोसले पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील आष्टा येथे अप्पर तहसिल कार्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून सन २०१८ मध्ये मंजूर करण्यात आले होते. यामुळे आष्टा शहरासह २७ गावांना या कार्यालयाअंतर्गत सेवा पुरवणे सोयीचे झाले. मात्र सदर कार्यालयाचे कामकाज हे जुन्या व भाडेतत्वाच्या इमारतीतून सुरु आहे.
याठिकाणी आवश्यक असणारी सुसज्ज इमारत सोयी-सुविधा नसल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. सदर कार्यालयाला स्वतंत्र इमारत असावी. इमारतीमध्ये सर्व सोयी- सुविधा असाव्यात, अशी मागणी नागरिकांची असून यासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारत उभारणीकरिता रक्कम रु. १५ कोटी इतका निधी विशेष बाब म्हणून आपण मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.