पेठ-सांगली महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आष्टा- सांगली रस्त्याचे काम दोन्ही बाजूने ८०%पूर्ण झालेले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टीच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच दुभाजकावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काळे-पांढरे पट्टे ओढण्यात येत आहेत. तसेच मिरजवाडी, कारंदवाडी, तुंग या परिसरात दुभाजकाच्यामधल्या जागेत ठिकाणी विजेचे खांबही लावण्यात आलेले आहेत. तुंग ते सांगली यादरम्यान सुमारे एक किलोमीटर अंतरावर टोल नाका करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
मात्र या टोलनाक्याचे व मार्गाचे काम रखडले आहे. आष्टा ते तुंग सुमारे सात किलोमीटर अंतर केवळ ७ मिनिटांचे आहे. मात्र तेथून पुढे एक ते दीड किलोमीटर अंतर जाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागत आहेत. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या मुरमाच्या खराब रस्त्यावरून जाताना दुचाकी, चारचाकी तसेच ट्रक व एसटी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा महामार्ग तातडीने करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.