इचलकरंजी पंचगंगेतील गाळमिश्रित वाळू काढण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे; पुराचा धोका होणार कमी

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुराची भीती कमी करण्यासाठी माती मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, काही व्यक्तींनी केलेल्या गडबडीमुळे वाळू उपसा थांबवला. तोच विषय पुढे करीत प्रशासनाने दीड महिन्यापासून काम थांबवले आहे. काही व्यक्तींच्या अपप्रवृत्तीमुळे प्रशासनाने घेतलेला चांगला निर्णय थांबवणे योग्य नाही. योग्य नियोजन करून पुन्हा गाळ मिश्रित वाळू काढण्यासाठी प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. तरच नदीची खोली वाढेल आणि पुराचा धोका कमी होईल, असे जाणकारातून बोलले जात आहे.

पंचगंगा नदीला येत असलेल्या महापुरामुळे इचलकरंजी शहरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे नदीपात्राची खोली वाढवावी अशी मागणी गेल्या पंधरा वर्षापासून होत होती. त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाटबंधारे विभागाशी सल्ला मसलत करून गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाचा सविस्तर आदेश येईपर्यंत काही व्यक्तींनी स्वतःहून गाळ मिश्रित वाळू काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याची जोरदार चर्चा झाली, प्रशासनाकडून अहवालही मागवण्यात आला. मात्र त्यानंतर नदीपात्रातील वाळू काढण्याचे काम थंडावले. वास्तविक पाहता यामध्ये जशी विनापरवाना गाळ मिश्रित वाळू घेणाऱ्यांची चूक आहे. तसेच प्रशासनाने दिलेला निर्णयही योग्य आहे का हे पडताळून पाहणेही गरजेचे आहे. प्रशासनाने गाळ मिश्रित वाळू काढण्यासंदर्भात जो आदेश दिला त्या आदेशामध्ये संधीगता होती.

त्यामुळे खालील कार्यालयात काम करणाऱ्यांना त्याचा अर्थ लावता आला नाही. तसेच त्यावर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश काढला असता तर गाळ मिश्रित वाळू चोरून घेणाऱ्यांचे धाडस झाले नसते.गाळ मिश्रित वाळू चोरून नेली म्हणून शहरातील चार लाख लोकसंख्येला भेडसावणाऱ्या पुराच्या प्रश्नावर निर्णय न घेता थांबणे योग्य नाही. गाळ मिश्रित वाळू चोरून घेणाऱ्यांचा दोष सर्वांनाच देऊन चालणार नाही. त्यावर प्रशासनाने उपाय शोधला पाहिजे आणि नदीपात्रातील गाळ मिश्रित वाळू काढण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. सध्या उन्हाळा आहे.

पावसाळा लागण्यास आणखीन दोन महिन्याचा कालावधी आहे. नदी पात्रात पाणी कमी आहे. या कालावधीत प्रशासनाला स्वतःची यंत्रणा लावून अथवा खाजगी यंत्रणेमार्फत गाळ मिश्रित वाळू काढता येते. त्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. वाळू काढल्यास पंचगंगा नदीचे पात्र खोल होणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वाळू काढण्यात येणार आहे त्या ठिकाणी गाळ साचला आहे. तो ही निर्गत होणार आहे, असेही बोलले जात आहे.