पंढरपूर तालुक्यातील ४६ महा ई सेवा केंद्र, सरकार सेवा केंद्र चालकांचे परवाने रद्द

पंढरपूर तालुक्यात हजारो महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रे आजही अस्तित्वात आहेत. यातील अनेक सेवा केंद्रे त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनाही माहीत नाहीत. याबाबत सरकोली येथील नागरिकांने फक्त कागदावरच असणारी तेथील ई सेवा केंद्रे रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सेवा केंद्रे रद्द करण्याचा आदेश दिला असून तालुक्यातील इतर ३५ ई सेवा केंद्रांचाही यामध्ये समावेश आहे. आपले सरकार ई सेवा केंद्र अस्तित्वात आणण्यासाठी त्या त्या गावच्या ग्रामपंचायतीचा मोठा सहभाग असतो.

यामुळेच गावोगाव या केंद्रांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यातील या ई सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले होते. याबाबतची तपासणी करून प्रांताधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिला होता. जिल्हा सेतू समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. दरम्यान पंढरपूर तालुक्यातील आपले सरकार ई सेवा केंद्रांची तपासणी करून तालुक्यातील ४६ केंद्र चालकांचे परवाने रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात आपले सरकार ई सेवा केंद्र चालकात मोठी खळबळ उडाली आहे.