आष्टा येथे डंपर-दुचाकीची धडकेत वडिलांसह दोन मुले ठार

कुंडलवाडी येथील पटेल पती-पत्नी व दोन मुले असे कुटुंबीय मोटरसायकल वरून आष्ट्याकडून इस्लामपूरकडे निघाले होते. अशपाक हे गाडी चालवीत होते. असद हा त्यांच्या पुढे बसला होता. तर मागील बाजूस अशरफ व त्या मागे हसीना बसल्या होत्या. त्यांची गाडी आष्टा येथील शिंदे मळा येथे आली इस्लामपूरकडून आष्ट्याकडे खडी वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने येत होता. डंपर व मोटरसायकलची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये दुचाकीवर पुढे बसलेला असद पाठीमागे फेकला गेला. त्याच्या डोकीला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन तो जागीच ठार झाला. अशपाक यांचा उजवा पाय मोटरसायकल व डंपरमध्ये अडकला, डोक्यावर पडल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

मागील अशरफ डाव्या बाजूला फेकला गेला. त्याच्या पायाला, डोकीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेल्या हसीना या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ सांगलीतील दवाखान्यात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात इतका जोरात होता, की मोटरसायकलचे चाक तुटून टाकीपर्यंत चेपली होती. धडक बसलेल्या ठिकाणी डंपरही चेपला होता. पटेल कुटुंबीय मिरज येथे सासरवाडीला गेले होते. येताना त्यांनी सांगली येथे सणानिमित्त मुलांना कपडे व इतर साहित्य खरेदी केले. इस्लामपूर येथून ते कुंडलवाडीला जाणार होते. मात्र आष्टा येथेच अपघात झाला. या अपघाताची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.