इस्लामपूर- उरूण परिसरातील धनगर गल्ली येथे एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या सुमारास दारातच जादूटोणा, करणीचे साहित्य ठेवल्याची घटना समोर आली. त्यांच्या दरवाजाच्या बाहेर बकऱ्याचे मुंडके, चार पाय संगीत दोरीने लटकवले होते. त्यावर लिंबू, सुया, पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळया बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या. २१ लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही पिना टोचलेले समोर ठेवले होते. त्याचबरोबर मिरच्या, काट्यांची पांजर, मोडलेले फांदी, पपई, कोरफडीचे तुकडे, तसेच हळदी कुंकू गुलाल टाकला होता.
यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्याशी संपर्क केला. काही वेळातच घटनास्थळी पोलीस आले. संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजावून सांगत त्यांचे प्रबोधन केले. सर्व साहित्य संजय बनसोडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांकडे केली आहे.
