पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात भावीक काही ना काही अर्पण करत असतात. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस एका दानशुर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे ६ लाख ५० हजार किंमतीचे दागिने व २ लाख रूपयाची देणगी मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल रा. ठाणे यांनी कै. परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे ७३.९५० ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत.
त्याची अंदाजे ५ लाख ८२ हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल देणगीदार भाविकांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे कर्मचारी रमेश गोडसे यांच्या हस्ते श्रींचा फोटो, उपरणे, दिनदर्शिका व दैनंदिनी देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय, संकेत भास्कर पंडित रा. छत्रपती संभाजी नगर या भाविकाने ९.८०० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अर्पण केली असून, त्याची ७७ हजार इतकी किंमत होत आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तसेच पी एस कुमारगुरूतम, चेन्नई यांनी धनादेश स्वरूपात २ लाख रूपयाची देणगी दिली. त्यांचा देखील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते उपरणे व श्रींचा फोटो देऊन सन्मान करण्यात आला.