इस्लामपूर शहरातील जनतेच्या मुलभूत सोयीसुविधा आणि विकासासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्याकडे केली. हे मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी निवेदनाव्दारे केली. उरुण-इस्लामपूर शहरात जवळपास १ लाख इतकी लोकसंख्या असून नागरी जीवनाशी संबंधीत दैनंदीन प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. इस्लामपूर शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छतागृह, घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमणे, उपनगरातील गुंठेवारी नियमितीकरण, भाजी मंडई असे अनेक विषय महत्वाचे आहेत.
इस्लामपूर शहरामध्ये गेली अनेक वर्षे भुयारी गटार योजनेचे काम सुरु असून शहरातील काही रस्ते उखडले गेले आहेत. पाईप टाकल्या, चेंबर तयार केले. या सर्व कामांमुळे नागरिकांना खड्डे आणि धूळ सहन करावी लागली. बऱ्याच वर्षाचा कालावधी लोटला तरी ही लाखो रुपयांची शासकीय योजना पूर्णपणे अपूर्ण व अपयशी ठरली आहे. शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. यासाठी जबाबदार, पारदर्शक व लोकाभिमुख अधिकारी म्हणून जनतेला मदत होईल अशी कामगिरी करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
शहरातील उपनगरात मुलभूत सुविधा नसल्याने पावसाळ्यात अनेकांच्या घरात मैला मिश्रीत पाणी शिरत आहे. त्यामुळे रोगराई वाढत आहे. यामुळे उपनगरातील नागरिक त्रस्त आहेत. शहरातील शासकीय क्रिडांगणाच्या अपुऱ्या विकासामुळे खेळाडूंना एकही क्रीडांगण खेळण्यास नसल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे असे ही निवेदनात म्हटले आहे.