सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या राजेवाडी गावातल्या म्हसवड तलावाचे फलटणचे विभागीय कार्यालय सातारा येथे, पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय गोंदावले येथे तर महुद येथील पूर्वीच्या शाखा कार्यालया बरोबरच आणखी एक शाखा कार्यालय म्हसवड येथे सुरु करण्याचा नवा प्रस्ताव सातारा जिल्ह्यातील एका नेत्याच्या आग्रहावरून अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे पाठविल्याचे समजले आहे. या प्रस्तावामुळे आटपाडी तालुक्यावर पुन्हा मोठा अन्याय होऊ शकतो.
राजेवाडीतील म्हसवड तलावाचे फलटणचे विभागीय कार्यालय सांगली जिल्हा जलसंपदाकडे वर्ग व्हावे. पंढरपूरचे उपविभागीय कार्यालय आटपाडी येथे सुरू करावे. आणि महुद येथील शाखा कार्यालय तलावाच्या मुख्य ठिकाणी म्हणजे राजेवाडी येथे व्हावे. राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे १४० वर्षानंतर तरी नाम करण राजेवाडी तलाव असे केले जावे. ही आटपाडी तालुक्याच्या हिताला मोठा न्याय देणारी महत्वाची मागणी आहे. या दृष्टीने आपण सातत्याने सरकारचे लक्ष वेधल्याचे सादिक खाटीक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले.
आटपाडी तालुक्याच्या हिताच्या मागण्या संदर्भात आ. सुहासभैय्या बाबर खानापुर, आ. गोपीचंद पडळकर जत, आ. रोहितदादा सुमन आर आर आबा पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. उत्तमराव जानकर माळशिरस, आ. बापूसाहेब पठारे वडगांव शेरी पुणे, आ. जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ. अभिजित पाटील माढा या आठ आमदारांना तर खासदार विशालदादा पाटील, खा. अमोल कोल्हे शिरूर, खा. अमर काळे वर्धा, खा. फौजिया खान परभणी या लोकप्रतिनिधींच्यासह पाणी संघर्ष समितीचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर कासेगांव, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक, आटपाडीचे सुपुत्र राजीव खांडेकर मुंबई या मान्यवरांचा समर्थन देणाऱ्यात समावेश आहे.
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या मागण्या सत्यात येण्या संदर्भाने विशेषतः सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील लोकप्रतिनिधीनी विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी आवाज उठवावा आणि राज्यातल्या संसद सदस्यांनी आटपाडी तालुक्याच्या न्याय मागण्याच्या समर्थनार्थ राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहावीत, असे प्रसार माध्यमातून आग्रही आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे.
