इचलकरंजी येथे बलिदान मासची मूक पदयात्रेने सांगता; युवक-युवतींचा सहभाग

सकल हिंदू समाजाच्यावतीने छ. संभाजी महाराज बलिदान मास निमित्त पूर्ण महिनाभर व्रत पाळला होता. इचलकरंजी तेथे शनिवारी सकाळी मंगलधाम येथील गणेश मंदिराजवळ शहर वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या हस्ते ध्वजपूजन व ज्वाला पूजन करून शहरातील मुख्य मार्गावरून मुक पदयात्रा काढण्यात आली. मूक पदयात्रेने बलिदान मासची सांगता करण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक-युवती, महिला आणि बालकांनी सहभाग घेतला होता. 

शनिवारी दुपारी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने वढूबुद्रुक येथून आणलेली ज्वाला पूजन तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, गजानन महाजन गुरुजी, रवींद्र माने, शिवजी व्यास, अमृत भोसले, अनिल डाळ्या, जयेश बुगड, राजू बोंद्रे, सतीश मुळीक, बाळासाहेब ओझा, दीपक पाटील, मोहन मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. पदयात्रेच्या अग्रभागी ज्योत आणि भगवा ध्वज होता. त्यामागे शस्त्र पथक व हजारो धारकरी सहभागी झाले होते.

ही मूक पदयात्रा चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवतीर्थ, कॉ. के. एल. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, झेंडा चौक, श्रीमंत घोरपडे नाट्यगृह मार्गे गणेश मंदिराजवळील मैदानात पोहोचली. या वेळी प्रमुख वक्ते विठ्ठल जगताप यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती उपस्थितांना दिली.