विटा येथे केले इफ्तार पार्टीचे आयोजन; आ. सुहास बाबर यांची उपस्थिती

विटा शहरातील मुल्लागल्लीतील मस्जिदच्या प्रवेशव्दारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार सुहास बाबर उपस्थिती होते. मी कुणाचेही ऐकत नाही. मी जो तुमच्या समाजाचा उमेदवार देईन. त्याच्या पाठीशी तुम्हाला ठामपणे उभा रहावेच लागेल, असा आग्रह धरत आमदार सुहास बाबर यांनी आगामी विटा नगरपालिका निवडणुकीचे इरादे स्पष्ट केले.  यावेळी निमित्त इफ्तार पार्टीचे असले तरी कार्यक्रमात चांगलीच राजकीय चौफेर फटकेबाजी रंगली.

आ. बाबर म्हणाले, मुस्लिम समाजाच्या पाठीमागे प्रत्येक नगरपालिका निवडणुकीत आम्ही उमेदवारीसाठी आग्रह धरतो. पण तुम्हीच निवडणुकीपासून लांब राहता. यावेळच्या विटा नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला तसे करता येणार नाही सुरुवातीला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजू मुल्ला यांनी दिवंगत अनिलभाऊ बाबर यांचे मुस्लीम समाजाशी असणारे अतूट नाते सांगत पदर पसरून आमच्या समाजाच्या ओट्यात मागेल ते टाकत जावा, अशी मागणी केली.

शहानवाज मुल्ला यांनी आमदार सुहास बाबर यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला मंजूर केले. विटा शहरासाठी मंजूर करून आणलेला निधी याचा अभिमान असल्याचे सांगितले. अबीद शेख यांनी बाबर कुटुंबीय हे नेहमीच जातीपातीच्या पलिकडे जीवाभावाचे नाते जपतात असे सांगत येणाऱ्या नगरपालिका निवडणूकीत समाजाला संधी द्यावी, असे सांगत किमान स्वीकृत नगरसेवक म्हणून तरी आमचा विचार करावा, अशी मागणी केली. आ. सुहास बाबर यांनीही भाषणात मुस्लीम बांधवांचे आणि आमचे नाते घट्ट आहे व ते यापुढे तसेच राहिल असे सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होणार नाही असा काहींचा समज होता. आणि आमदार म्हणून माझ्यावर खापर फोडून राजकीय डाव साधण्याचा काहींचा प्रयत्न होता. त्यासाठी मतदारसंघाच्या पदरी निराशा आल्याच्या बातम्याही प्रसिध्द करण्यात आल्या. पण जेव्हा आपण हे उपकेंद्र मंजुर केले तेव्हा हीच मंडळी बोर्ड लावण्यात पुढे आहेत. अशी टीकाही आ. बाबर यांनी केली.