विट्यात चारित्र्याच्या संशयावरून महिलेला मारहाण!

चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत असलेल्या, एका महिलेच्या मानेवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना विट्यात घडली.या प्रकरणी पीडित महिलेने संशयित बापूराव किसनराव पाटोळे (रा. रेणावी, ता.खानापूर) याच्या विरोधात विटा पोलिसात फिर्याद दिली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला या गेल्या सात वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. त्यांना तीन मुले आहेत. अशातच त्या काही वर्षांपासून खानापूर तालुक्यातील रेणावी येथील बापूराव पाटोळे यांच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. हे दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. (दि.25) सकाळी पावणेआठ वाजता बापूराव पाटोळे यांनी संबंधित महिलेला ‘तू जिथे कामाला जातेस तिथे तुझे अनैतिक संबंध आहेत,’ असा आरोप केला, ज्यानंतर त्यांच्यात जोराचा वाद झाला.

त्या वादानंतर ऊस तोडण्याच्या कोयत्याने महिलेच्या मानेवर, डाव्या-उजव्या हातावर, डाव्या पायावर वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित महिलेने घरातून पळ काढला. ज्यामुळे ती जीव वाचवण्यात यशस्वी ठरली. याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.