माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळत वाळवा तालुक्यातील भाजपा कार्यकारिणी कार्यरत ठेवली होती. पण , सध्या निशिकांत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यामुळे भाजपा नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपची कार्यकारिणी संपुष्टात आली आहे. आगामी काळात भाजपाचे नेते वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात नेतृत्वाचा शोध घेत आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान इस्लामपूर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? असा प्रश्न महायुतीपुढे निर्माण झाला होता.
राज्यातील जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आला. त्यामुळे भाजपाचे नेतृत्व करणारे निशिकांत पाटील यांनी पक्षांतर केले. इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आजही खमके नेतृत्व नाही. त्यामुळे सध्या तरी राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडे हंगामी नेतृत्व आहे. अजित पवार गटाची तालुकाध्यक्ष पदाची धुरा केदार पाटील यांनी सांभाळली आहे. शिंदेसेनेचे नेतृत्व आनंदराव पवार यांच्यासह गौरव नायकवडी पाहत आहेत. आता फक्त भाजपामध्ये खमके नेतृत्व शोधण्याचे राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर अल्पावधीतच इस्लामपूर मतदारसंघातील बरेच पाणी पुलाखालून गेले. निशिकांत पाटील यांचे भाजपामधील नेतृत्व संपताच भाजपाचीच धुरा युवा नेते राहुल महाडिक आणि विक्रम पाटील यांच्याकडे गेली आहे. या दोघांपैकी कोणाला नेतृत्वाची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाळवा तालुक्यासह इस्लामपूर शहरात विक्रम पाटील आहेत. त्यानंतर आमचे नेते राहुल महाडिक जो निर्णय घेतील, त्यांच्या आदेशानेच तालुक्यासह इस्लामपूर कार्यकारिणी तयार होईल, असे माजी नगरसेवक कपिल ओसवाल हे म्हणाले.