फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिलीपतात्या पाटलांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

राष्ट्रवादीचे शेलारमामा म्हणून प्रसिद्ध असणारे दिलीपतात्या पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे राजकारणातून संन्यास घेत असल्याची पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यांच्या निर्णयाने आ. जयंत पाटील यांना धक्का मानला जात आहे. याबाबत माहिती अशी, मंगळवारी सकाळी दिलीपतात्या पाटील यांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेतली होती. दोघांनी तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर दिलीपतात्या पाटील हे कामानिमित्त पुण्याला गेले. रात्री नऊच्या सुमारास दिलीप तात्यांनी मी आजपासून सक्रीय राजकारणातून निवृत्त होत आहे. असले घाणेरडे राजकारण व समाजकारण समाजाला नासवत आहे. अशी पोस्ट फेसबुकवर केली.

राजकारणातून निवृत्त होऊ नका अशी विनती केली. तर काहींनी एप्रिल फुल आहे का अशी विचारणा केली. त्यावरही दिलीप तात्यांनी दुसरी पोस्ट केली. मला बरेच फोन येत आहेत कि एप्रिल फुल आहे. पण मी नम्रता पूर्वक सांगतो हा माझा निर्णय आहे. समाजाला फुल करायला मी एवढा खालच्या मनोवृत्तीचा नाही. अशी पोस्ट करत राजकारणातून निवृत्त होत असल्याचे शिक्कामोर्तब केले. जारामबापू कारखान्याचे संचालक, राज्य वस्त्रोद्योग संघाचे अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपातळीवर नेते म्हणून दिलीपतात्यानी कारकीर्द गाजवली आहे.

रोखठोक स्वभाव व स्पष्टवक्तेपणामुळे ते परिचित आहेत. स्व. राजारामबापू पाटील यांच्यानंतर आ. जयंत पाटील यांच्या पाठीशी दिलीप तात्या पाटील आज अखेर खंबीरपणे राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीत विरोधकांचे वार स्वतःच्या अंगावर झेलत दिलीप तात्यांनी अनेक वेळा प्रति हल्ले केले आहेत. विरोधकांना नामोहरम करण्याचे काम त्यांनी केले आहे. काही दिवसापासून दिलीपतात्या राजकारणापासून अलिप्त होते. आज त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजकारणातून संन्यास घेत असल्याची माहिती दिली. या निर्णयाचे पडसाद वाळवा तालुक्यात उमटण्याची शक्यता आहे.