सांगली जिल्ह्यातील आठ जागापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) लढत असून यापैकी दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी थेट लढत होत आहे. भाजपने इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देत असताना माजी खासदारासह जिल्हाध्यक्षांनाही उधारीवर देउन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असल्याने या लढतीकडे आता राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांना मतदार संघातच अडकवून ठेवण्यासाठी प्रसंगी त्यांचा गड काबीज करण्याची व्यूहरचना केल्याचे दिसून येते. मतदार संघात घड्याळावर श्रध्दा असलेला मतदार आपणाकडे वळविण्याबरोबरच गेल्या विरोधकामध्ये ऐक्य घडविण्याची रणनीती यावेळी आखली जाणार आहे. विरेाधकांचा चेहरा म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष भोसले-पाटील यांना पुढे करण्यात आले आहे.
आता एकास एक लढत झाली तरच ही व्यूहरचना यशस्वी ठरण्याची चिन्हे दिसतील, अन्यथा विरोधकांतील बेबनाव हीच आमदार पाटील यांच्या यशाची खात्री असेच आजपर्यंतचे चित्र पाहण्यास मिळत आले आहे. गेल्या सात निवडणुका सलग जिंकून आमदार पाटील यांनी मतदार संघावर एकहाती वर्चस्व सिध्द केले आहे. यावेळी केवळ भाजपसोबतचा उघड संघर्ष तर आहेच, पण आता भाजपच्या जोडीला उपमुख्यमंत्री अजित पवारही आहेत.