हातकणंगले तालुक्यातील मनपाडळेत वन्य प्राण्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १३ मेंढ्यांची पिल्ले ठार झाली, तर ३ मेंढ्यांची पिल्ले जखमी झाले. यात मेंढपाळाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना नुकतीच घडल्याने खळबळ उडाली आहे. मनपाडळेच्या दक्षिणेला मोकाशी मळ्यात भासले यांची शेती आहे. मागील तीन आठवड्यापासून खतासाठी दिलीप बंडगर या मेंढपाळाच्या सुमारे २०० मेंढ्या शेतात बसविल्या होत्या. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भोसले यांच्या शेतात मेंढ्यांची पिल्ले होती. यावर अचानक वन्यप्राण्याने हल्ला चढविला.

याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी नरेंदेचे वनपाल एम. एस. पोवार, वनसेवक श्रद्धा सोनटक्के यांनी घटनेची पाहणी करत पंचनामा केला. पशुधन अधिकारी डॉ. अश्विनी बोंगार्डे यांनी शवविच्छेदन केले. मेंढ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि शवविच्छेदनाने परिसरात बास पसरल्याने गावठी व जंगली कुत्रे दिवसभर मेंढपाळांना त्रास देत होती. मेंढपाळाचे सर्व कुटुंब दिवसभर उरलेल्या मेंढ्यांची रक्षण करीत होते.