आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव यासह सांगोला तालुक्यातील खवासपूर कटफळ दुधाळवाडी लक्ष्मीनगर अचकदानी शेरेवाडी येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता राजेवाडी तलावातून पाणी सोडावे, याकरिता दिघंची येथील फुले शाहू आंबेडकर चौकात रस्ता रोको केला. वारंवार पाठपुरावा करूनही तलावातून पाणी सोडण्यात आले नव्हते. सततच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने हा रस्ता रोको केला.
यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तलावात पाणी शिल्लक असतानाही उन्हाळी हंगामाचे आवर्तन सोडले नाही या भागातील शेतकरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून असून जनावरांसाठी चारा पिके शेतकरी याच पाण्याच्या भरवश्यावर करत असतात परंतु पाण्याचे आवर्तन न सुटल्याने पिके जळू लागल्यामुळे शेतकऱ्याने आंदोलन केले. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
सर्वांनी विनंती करूनही शेतकरी मागे हटले नाहीत. राजेवाडी तलावातून पाणी सोडल्याने दीड तासाच्या रास्ता आंदोलनावर तोडगा निघाला. राजेवाडी तलावातून पाणी सोडल्याचे आंदोलनकर्त्याना आ. सुहास बाबर यांनी कळविले. पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून लाभधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.