विटा तहसीलमध्ये जनतेच्या सोयीसाठी दाखला मेळाव्यास प्रारंभ 

जनतेच्या सोयीसाठी तहसील कार्यालयामार्फत विशेष दाखला मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली. तहसीलदार टोंपे म्हणाले की, १०० दिवस कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन गतिमानता अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने विटा तहसील कार्यालयामार्फत जातीचा दाखला मेळाव्याचे आयोजन केले आहे. काल गुरुवारी या मेळाव्यास प्रारंभ झाला.

१० एप्रिलपर्यंत हा मेळावा तलाठी सजा या ठिकाणी होईल. नागरिकांना सुलभ पद्धतीने दाखले मिळतील. या कॅम्पमध्ये नंदीवाले, मरीआई, गारुडी, मदारी, रामोशी, वडार, कुणबी इत्यादी घटकांना प्राधान्याने जातीचे दाखले दिले जाणार आहेत. हे दाखले अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्याचा संबंधितांना उपयोग होणार आहे.