राज्यात सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य  दाखवले जाणार आहे. राज्यात 40 कोटी खर्च करून 36 जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या महानाट्याचा प्रयोग होईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त दिनांक 2 जून, 2024 ते दिनांक 6 जून, 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या त्या जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्याला बोलावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. 

350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली, अलौकीक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात शिवरायांवरील महानाट्य दाखवणार असल्याची घोषणा केली आहे. काही मंडळी याकडे राजकारण म्हणूनदेखील बघतील. पण राज्यसरकारने असं न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 राज्याभिषेकानिमित्त 2 ते 6 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. यासाठी त्यांनी 40 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 

शिवाजी महाराजांवरील महानाट्य कोणतं असेल हे अद्याप सरकारने जाहीर केलेलं नाही. जून 2024 च्या आत प्रत्येक जिल्ह्यात या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ आलेल्या असताना राज्यसरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकराचे महानाट्य दाखवले जाणं यावर विरोधक टिका करू शकतात. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील महानाट्य म्हटलं की आकर्षक प्रकाशयोजना, घोडे, बेलगाडे आले. 250 पेक्षा अधिक कलाकार, नेत्रदीपक आतषबाजी आणि अनेक रोमहर्षक प्रसंग यांचा समावेश होतोच. आता राज्य सरकार कोणतं महानाट्य दाखवणार याची शिवप्रेमी आणि नाट्यप्रेमींना उत्सुकता आहे.