इचलकरंजी आगारात नव्याने ५ बसेस दाखल; आम. राहूल आवाडे यांच्या पाठपुरवठ्याला यश

इचलकरंजी हे हातकणंगले तालुका, आसपासचा परिसर आणि नजीकच्या सीमावर्ती भागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकाच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसुल मिळतो. परंतु याठिकाणी सध्या असलेली दळणवळण यंत्रणा ही अपुरी पडत होती.त्यासाठी इचलकरंजी बसस्थानकात नवीन बसेसची गरज निर्माण झाली होती. या संदर्भात इचलकरंजी आगाराकडून आमदार राहल आवाडे यांच्याकडे शासन दरबारी पाठपुराव्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून नवीन ५ बसेस दाखल झाल्या आहेत.

या बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उपस्थिती होती. या नवीन बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार आहेत. संपूर्ण अत्याधुनिक सुविधा व यंत्रणा असलेल्या या बसेसमुळे इचलकरंजी आगाराच्या वैभवातही भर पडली आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार राहूल आवाडे यांच्यासह उपस्थिती अधिकारी व मान्यवरांनी या नवीन बसमधून शहरातून फेरफटका मारत या नवीन बसमध्ये असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.