विटा आगारात नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा आ. सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न

विटा आगारासाठी प्राप्त झालेल्या नवीन ५ एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते बसस्थानकात पार पडला. यावेळी बोलताना आ. बाबर म्हणाले, विटा आगार व आटपाडी लवकरच आणखीन नवीन एसटी बसेस उपलब्ध होतील.  या नवीन बसेसचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पूजन करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, आगारप्रमुख उदय पवार, स्थानकप्रमुख रोहित गुरव, माजी सभापती दादासाहेब माने, नगरसेवक अमर शितोळे, कन्हैय्या पवार, शिरीष शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, पूर्वीच्या काळात गावात एसटी बस येणे मोठी मानाची गोष्ट समजली जात होती. खासगी वाहतुकीच्या बरोबरीने सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात अनेक आधुनिक बस दाखल झाल्या असून याद्वारे महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देत प्रवाश्यांना एसटीकडे आकर्षित करून घेतले पाहिजे. स्वागत व प्रास्ताविक आगारप्रमुख उदय पवार यांनी केले. आभार स्थानकप्रमुख रोहित गुरव यांनी मानले.