आपल्या कुलदैवतावर असणारी अपार श्रद्धा, विश्वास व ओढ यासाठी अख्खं गावचं आबालवृद्धांसह देवाच्या गावी जाऊन कटफळ येथील बिरोबा देवाच्या दर्शनासाठी तीन दिवस मुक्काम करत आहे. गेल्या अनेक तपांहून अधिक काळ चालत आलेली परंपरा लेंगरेवाडी या गावाने जोपासली आहे. लेंगरेवाडीने गुरुवारी बैलगाडीतून देवाचा सासन व छबिना घेऊन पायी चालत गावातील प्रमुख मंडळी बिरोबाच्या भेटीसाठी गेले तर शुक्रवारी पहाटे सहा ते सात वाजता संपूर्ण गावच कटफळच्या माळरानावर कुलदैवताच्या भेटीसाठी ठाण मांडते.
थोर साहित्यिक व्यंकटेश तात्या माडगूळकर यांनी त्यांच्या बनगरवाडी या कादंबरीतून साकारलेल्या खेड्यातील गाव म्हणजेच आताची लेंगरेवाडी गाव अजूनही तसेच असले तरी येथील शेती व शेतकरी आता डाळिंबाच्या क्रांतीने समृद्ध झाला आहे. पिढी शिकली बदलली, जुन्या विचारांना तिलांजली देत आर्थिकदृष्ट्या उन्नतीकडे वाटचाल करू लागली आहे. मात्र हे करतानाच कुलदैवतांना मात्र विसरली नाही. दर सात ते आठ वर्षांतून धूळदेव व पुन्हा तीन ते चार वर्षांनी कटफळ येथील बिरोबा देवाला कुटुंबासह जातात. धुळदेवाच्या भेटीनंतर तीन ते चार वर्षांनी कटफळच्या बिरोबाला भेटण्याचा जणू अलिखित नियमच लेंगरेवाडीकरांनी घालून दिला आहे.