वाळवा तालुक्यातील पेठ येथे गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पेठ येथील सुतारमळा, साळुंखे पाणंद या ठिकाणी बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसांपूर्वी सुतारमळा येथे बिबट्या दिसल्यानंतर वनाधिकारी येऊन पाहणी करून गेले होते. शुक्रवारी रात्री कोळेकर गल्ली, बिरोबा मंदिर परिसरात बिबट्याने रात्री येऊन रणजित कोळेकर यांच्या घराबाहेरील पाळीव कुत्रे पळवले.
यामुळे पेठ गावात भीतीचे वातावरण आहे. याबाबतीत अतुल पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदरची बाब सांगितली. आज सकाळी वनाधिकारी विशाल डुबल व सरपंच डॉ. सुभाष भांबुरे यांच्या समवेत बिबट्याचा वावर असणाऱ्या सर्व परिसराची पाहणी केली. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
