सांगली लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील परंपरागत तडजोडीच्या (सेटलमेंट) राजकारणाला खासदार विशाल पाटील यांच्या बंडखोरीने तडा गेला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकारणात परिवर्तनाची लाट येण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती;
मात्र विशाल पाटील यांनी खानापूर मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटातील इच्छुक सुहास बाबर यांच्याविषयी वेगळी भूमिका घेतली. खानापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीतील काही नेते व कार्यकर्त्यांनी उघड नाही, पण छुपा पाठिंबा विशाल पाटील यांना लोकसभेवेळी दिला.
ते खानापूर-आटपाडी तालुक्यातील मताधिक्याने दिसून आले. हा पेरा फेडण्यासाठी विशाल पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यावर उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी टीका केल्यानंतर त्यांनी या विधानावरुन ‘यू-टर्न’ घेतला.